नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथे विहीर खोदण्यासाठी सुरुंग लावून केलेल्या स्पोटमुळे दगड उडून डोक्याला लागल्याने ऊस तोड मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २ जणांविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील रायतेल येथील सुदाम सुकलाल पवार व बुधीबाई सुदाम पवार हे दोघे पतीपत्नी ऊस तोडणीच्या कामासाठी मुकादम व इतर मजूरांसोबत नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथे गेले होते. शेतकरी जयवंत जयाराम गावित यांच्या शेतात ऊस तोडणी करून ऊसाच्या मोळ्या ट्रकमध्ये भरत होते. दरम्यान बाजूच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु असल्याने विहीरीत सुरुंग लावून स्पोट करण्यात आला.
विहीर खोदणार्या शेत मालकासह सुरुंग स्पोट करणार्या ट्रॅक्टर मालक यांनी परिसरातील लोकांना पूर्वसूचना न देता विहीर खोदतांना सुरुंग लावून स्पोट केला. हा स्फोट झाल्याने विहीरीतून बाहेर उडालेला दगड डोक्याला लागल्याने सुदाम सुकलाल पवार हे ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर सुदाम पवार यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
याप्रकरणी प्रकाश सुदाम पवार यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात शेतमालक दिलीप मौल्या गावित रा.देवलीपाडा ता.नवापूर, सुरुंग स्फोट करणार्या ट्रॅक्टर मालक विनायक तुकड्या गावित रा. खडकीपाडा, ता.नवापूर या दोघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०४ (अ) ३३८, ३४ व ज्वलनशिल पदार्थ अधि १९५२ चे क ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोह अरूण कोकणी करीत आहेत.