नंदुरबार | प्रतिनिधी
तोरणमाळ ता.धडगांव येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या धर्तीवर धडगांव तालुक्याच्या ठिकाणी तसेच अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीच्या किनार्याचा पट्टयावरील गावांचा समावेश करुन मोलगी येथे आंतरराष्ट्रीय निवासी शाळेची निमित्ती करून तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेतील रिक्त पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व वित्त समिती सभापती गणेश पराडके यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या कडे निवेदनाव्दारे केली.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी तोरणमाळ आंतरराष्ट्रीय निवासी शाळेला भेट दिली.त्याप्रसंगी जि.प. शिक्षण व वित्त समिती सभापती गणेश पराडके यांनी निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील शाळाबाहय मुलांचे प्रमाण, दुर्गम भागातील शिक्षकांना शाळेत जाण्यासाठीच्या अडचणी व अप्रगत विद्यार्थी यांचा एकत्रित विचार करता या केंद्रातील बालकांसाठी कायमचे निवास व शिक्षणाची सोय एकाच मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून व अतिदुर्गम भागातील बालकांना देखील उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ येथे आंतरराष्ट्रीय निवासी शाळेची निर्मिती झाली असून महाराष्ट्रात सदर उपक्रम यशस्वी रुपाने अंमलात आलेला आहे.
नर्मदा नदी किनार्याचा पट्टयावरील गावे, थुवाणी, शेलगदा, हट्टी, शिक्का व विस्थापीत गावांना व अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या सोई सुविधा पाहता तसेच दळणवळणाची साधने व संपर्काच्या अभावी शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. अश्या परिस्थितीत सदर शाळांचे एका ठिकाणी समायोजन करुन तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या धर्तीवर धडगांव तालुक्याच्या ठिकाणी तसेच अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीच्या किनार्याचा पट्टयावरील गावांचा समावेश करुन मोलगी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय निवासी शाळेची निर्मिती करण्यांत यावी सदर शाळेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक पातळीवर पालक तयार असल्याबाबत मी लोकप्रतिनिधी या नात्याने ग्वाही देतो.
तसेच तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत सद्यस्थितीत १७०० विद्यार्थी पट असून तिथे १ मुख्याध्यापक, १४ पदवीधर शिक्षक (६ वी ते ८ वी करीता), ०८ पदवीधर शिक्षक (९ वी व १० करीता), २ क्रीडा शिक्षक, २ कला शिक्षक, १ कार्यानुभव शिक्षक, स्विपर यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच शाळेकरीता सोलर पॉवर यंत्रणा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य सेवेसाठी कायमस्वरुपी आरोग्य पथक व रुग्णवाहिका उपलब्ध व पिण्यासाठी व वापरासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली.यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी तोरणमाळ ता.धडगांव येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी जि.प. शिक्षण व वित्त समिती सभापती गणेश पराडके, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई च्या उपसंचालकसौ.वैशाली वीर, राज्य प्रकल्प उप अभियंता योगेश बोराळे आदी उपस्थीत होते.








