नंदुरबार l प्रतिनिधी
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करुन कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक,डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी आज एक दिवसीय कामबंद आंदोलन केले होते.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर मागील १० ते १२ वर्षापासून कर्मचारी कामे करीत आहेत. कोरोना काळातही कोणतीही शासकीय सुविधा नसतांना मग्ररोहयो अंतर्गत योजनांचे गावामील प्रत्येक मजूराला कामे उपलब्ध करुन देऊन रोजगार दिला आहे. असे असतांना मागील ३ ते ४ वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. तसेच मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,
ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काल एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले.तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ जानेवारी रोजी असहकार व त्यानंतर दि.१ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, संघटनेचे हितेश गिरासे, जिल्हाध्यक्ष हर्षल वानखेडे, विनोद साबळे यांच्या सह्या असून निवेदन देतांना सुधीर पवार,हितेश गिरासे, हर्षल वानखेडे,विनोद साबळे, नितीन पाटील, राहुल बोरसे,दीपक कोळी,संदीप गवळे आदी उपस्थित होते.








