नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी पोलिस ठाण्यातील मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होवू न देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्विकारल्याप्रकरणी पोलिस शिपाई दारासिंग पावरा यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न होवू देण्याच्या मोबदल्यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई दारासिंग जोरदार पावरा याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार काल ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पोलिस ठाणे आवारात पोलिस शिपाई दारासिंग पावरा हा आठ हजार रुपयांची लाच स्विकारत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहात पकडले. सदरची कारवाई एसीबीचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, पोना.अमोल मराठे, मपोना. ज्योती पाटील, पोना. मनोज अहिरे यांच्या पथकाने केली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी नवापूर तालुक्यात लाच स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दि.१७ रोजी सुळी येथील मुख्याध्यापकाने शाळेच्या दाखल्यात आईचे चुकीचे असलेले नावात दुरुस्त करुन देण्यासाठी सोळाशे रुपयांची लाच स्विकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल पोलिस शिपायाने आठ हजाराची लाच स्विकारल्याने विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








