नंदुरबार l
बाल वैज्ञानिक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जाणीव जागृती निर्माण करून देणाऱ्या वासल्य सेवा समितीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य व नॅनो टेक्नॉलॉजी विषयाचे अभ्यासक डॉ. आर.एस. पाटील यांनी केले.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेला राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हा समनव्ययक संस्था वात्सल्य सेवा समिती नंदुरबार या मार्फत १७ व १८ नोव्हेबर रोजी जिल्ह्यातील २६८ बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण झाले. त्यापैकी १७ प्रकल्प हे राज्यस्तरावर निवडले गेले. व त्यातून २ प्रकल्प हे राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले.या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम ब्राह्मण वाडी येथे झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व नॅनो टेक्नोलॉजी विषयाचे अभ्यासक डॉ.आर.एस.पाटील उपस्थित होते. वात्सल्य सेवा समिती अध्यक्ष पंकज पाठक यांनी प्रास्ताविकातून समितीचे आज पर्यंतचे कार्य व आगामी काळातील नियोजन मांडले. तसेच उपक्रमातील सहभागी स्पर्धक केदार पाटील व कु दिया मंगलानी मार्गदर्शक शिक्षकांमधून जयश्री चव्हाण ,श्री निझामुद्दीन, श्रीमती नंबिता दास,राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थिनीचे पालक शीतल समर्थ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील यांनी लहान वयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधसनाचा विचार कसा करावा हे समजावून सांगताना अनेक वैज्ञानिकांच्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या.तसेच सद्य स्थितीत जगात सुरू असलेले संशोधनाबद्दल माहिती दिली. तसेच नंदुरबार जिल्ह्यातून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून वात्सल्य सेवा समितीचे प्रयत्न बघून त्यांनी समाधान व्यक्त केले व या संशोधन वृत्तीचे कार्य पुढे नेण्यासाठी,जिल्ह्यात सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक आशिष वाणी यांनी केले. नीरज देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन वात्सल्य सेवा समिती सचिव महेश जोशी , मंगेश उपासनी, डॉ.निर्मल गुजराती, श्रीराम दाऊदखाने यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी ,पालक, शिक्षक, परीक्षक, मार्गदर्शक इ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








