नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील काळंबा येथे शेतीच्या वादातून एकास लोखंडी सळईने डोक्यावर मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील काळंबा येथील अविनाश दामु बिऱ्हाडे यांना शेतीच्या वादातून बिजू गुलब्या गावित याने गळा दाबून ठेवला. यावेळी सागर बेडसे हे सोडविण्यास गेले असता राजू रुबजी गावित यांनी लोखंडी सळई डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच राजू रुबजी गावित याने कोयत्याने अविनाश बिऱ्हाडे यांच्यावर वार केला असता तो वार चुकविला. नितेश अर्जुन गावित याने बेसबॉलच्या दांड्याने अविनाश बिऱ्हाडे यांच्या मानेवार मारुन दुखापत केली.
तसेच नाथू रुबजी गावित, ठाकऱ्या रुबजी गावित, विजू शिवा गावित, समुवेल दित्या गावित, फुगाबाई बिजू गावित, राबडीबाई नाथू गावित, फिलीप दिलीप गावित, मुरजी बाबु गावित, अरविंद गुरजी गावित, मनोहर अशोक गावित, सुकलाल नरत्या गावित, अंशु अर्जुन गावित, सतिष पोसल्या गावित, राव बाबु गावित, सुनिल गुरजी गावित यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच अविनाश बिऱ्हाडे यांच्या खिशातील ४० हजार रुपये रोख व गळ्यातील दीड तोळ्याची चेन तोडून काढून नेत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अविनाश बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात १८ जणांविरोधात भादंवि कलम ३९५, ४५२, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.








