शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल,पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश आदिंची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवन कार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, एकांकिका आणि सावित्रीबाईंच्या ओवींचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.के.के.पटेल या होत्या.प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील प्रमुख अतिथी म्हणून लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली स्पर्धेच्या युगात शिकायचं असेल तर आपल्याला शालेय, महाविद्यालयीन जीवनातही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वतःचा विकास घडवून आणता येऊ शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.श्रीमती कल्पना पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की,शिक्षणानेच आपण परिवर्तन साधू शकतो. यासाठी खूप शिका, आज सर्वांना सहज शिक्षण मिळते आहे. त्या संधीचं सोनं करा असे आवाहन केले.विविध सादरीकरण विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषेत यशस्वीपणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी तनुश्री अनिल पाटील हिने केले तर आभार प्रकटन कुमारी लक्ष्मी रवींद्र पाटील हिने केले.
सदर विविध स्पर्धांसाठी प्रा .शिवनाथ पटेल,प्रा.डाॅ.डी. डी. पटेल , प्रा. मनोज चौधरी, प्रा.मधुकर ठाकरे, प्रा. चंद्रकांत पाटील यांनी परीक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रा. लक्ष्मण बोरसे, प्रा.उर्मिला पावरा यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.








