नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण समिती संचालित श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल मधील अटल टिंकरिंग लॅब येथे दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ०३ जानेवारी २०२३ या कालावधीत इयत्ता सहावी ते दहावी साठी प्लॅनेट कोड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळा नीती आयोग, अटल इनोवेशन मिशन, डेल टेक्नॉलॉजी व लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये इयत्ता सहावी ते दहावी च्या एकूण १७७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लर्निंग लिंक फाउंडेशनच्या मार्गदर्शक कोमल राऊत यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधत प्लॅनेट कोड या प्लॅटफॉर्मचे मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध कोर्सेस ची माहिती दिली.

कार्यशाळेत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना डान्सिंग विथ ए. आय. या सॉफ्टवेअरची माहिती देण्यात आली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना वेब डिझाईनिंग कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना वर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी व मोबाईल ॲप डेव्हलपमेंट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना टिंकर कॅड या सॉफ्टवेअरच्या मदतीने विविध सर्किट कसे निर्माण करावेत याबद्दल माहिती देण्यात आली.

कार्यशाळेत शिकविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्लॅनेट कोड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रमाणपत्र देखील मिळविले.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे संयोजन अटल टिंकेरींग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी केले. कार्यशाळेस मृणाल देवकर, महेश पाटील यांनी सहकार्य केले.








