नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील विजापूर येथे जबरदस्तीने शेती नावावर करुन घेण्याच्या कारणावरुन सात जणांना मारहाण करुन मंगळसूत्र चोरुन नेल्याप्रकरणी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील विजापूर येथील रिबीका विजू गावित यांचे पती विजू गुलब्या गावित यांच्या आईचे मामा नपऱ्या गंजी गावित यांची शेती जबरदस्तीने नावावर करुन घेण्याच्या कारणावरुन अर्चना अविनाश बिऱ्हाडे, अविनाश दामू बिऱ्हाडे, आकाश बेडसे, विशाल बेडसे, अतुल पगारे यांच्यासह १५ ते २० जणांनी नपऱ्या गंजी गावित व त्यांची पत्नी कातुडीबाई नपऱ्या गावित यांना पळवून नेत असतांना रिबीका गावित व त्यांचे पती विजू गुलब्या गावित व भाऊ यांनी अडविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रिबीका गावित यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेतले. तसेच २० ग्रॅम सोन्याचे झुंबर धक्काबुक्कीत पडून गेले. तसेच हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत रिबीका गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात २५ जणांविरोधात भादंवि कलम ३९५, ३६५, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नानाजी वाघ करीत आहेत.








