नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 3 गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, पलायन केलेले सर्व आरोपी पुन्हा जेरबंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 5 डिसेंबर 2022 रोजी रात्रौ 1.15 वा. सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण रा- कुंजखेडा ता- कन्नड जि. औरंगाबाद, इरफान इब्राहिम पठाण, युसुफ असिफ पठाण, गौसखाँ हानिफखॉ पठाण रा- ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद, अकिलखा ईस्माईलखॉ पठाण रा- कठोरा बाजार ता- भोकरदन जि- जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाडी ( MH 13 N 7626) वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 6.45 वा. अटक करण्यात आली होती.

तसेच अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहाता आरोपी हैदर पठाण व युसुफ पठाण यांच्यावर मध्य प्रदेश राज्यातील रतलाम पोलीस ठाणे येथे प्रत्येकी 1, इरफान पठाण यांच्यावर कन्नड जि. औरंगाबाद पोलीस ठाणे येथे 1 व गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व आरोपी गौसखाँ पठाण यांच्यावर औरंगाबद जिल्ह्यातील अजिठां, कन्नड, सिल्लोड इत्यादी ठिकाणी 8, मध्य प्रदेश राज्यातील रतलाम येथे 2 मालमत्ते विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
परंतु 5 डिसेंबर 2022 रोजी 9.05 वा. सुमारास वर नमुद पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या दोन तासापूर्वी अटक केलेल्या दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या आरोपीतांनी लॉकअपची खिडकी फोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते सराईत आरोपी असल्याचे
निष्पन्न झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी फरार आरोपीतांचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे 6 वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांचे मुळ गाव असलेले औरंगाबाद, जालना जिल्ह्यात. गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना केले.
आरोपीतांचा नवापूर तालुक्यात व नवापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात सर्वत्र शोध मोहिम राबवून नवापूर तालुक्यातील सर्व परिसत पिंजून काढला. 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला आरोपी हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण रा. कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने व 8 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकीलखाँ ईसमाईलखाँ पठाण रा. कठोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना यास मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गावाच्या जंगलातून पकडण्यात यश आले. परंतु फरार असलेले तीन आरोपीतांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे सतत पथकांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांचे नेतृत्वाखाली असलेले पथक लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीतांचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेले मुळ गावी ब्राम्हणी गराडा येथे त्यांचा शोध घेत होते, परंतु आरोपीतांचे गाव जंगलात असल्यामुळे त्यांना तेथे असलेल्या भौगोलीक परिस्थितीची एकाप्रकारे नैसर्गीक मदतच मिळत होती. दोन्ही पथके वेशांतर करुन संशयीत आरोपीतांच्या घराच्या आजूबाजूला रात्रंदिवस पाळत ठेवत होते.
फरार झालेले आरोपी हे सराईत व अत्यंत चलाख असल्यामुळे ते सहज कोठे बाहेर येत नाहीत व त्यांच्या गावाच्या लगत असलेल्या जंगलात राहात असतात. त्यामुळे पथकाला आरोपींचा नेमका ठावठिकाणा समजून येत नव्हता. नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सारख्या तालुक्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढले.
28 डिसेंबर 2022 रोजीच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीतांच्या गावालगत असलेल्या जंगलातील शेतात गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण हे लपून बसले असल्याची बातमी मिळाल्याने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने ब्राम्हणी गराड़ा गावाच्या बाहेर असलेल्या जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला. परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून तीन इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यांना शिताफीने इरफान इब्राहिम पठाण, युसुफ असिफ पठाण, गौसखा हानिफखाँ पठाण रा. ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद यांना अटक करण्यात आली आहे.
नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या पाचही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी अथक परीश्रम घेवून पुन्हा जेरबंद केले, मासिक गुन्हे बैठकीत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ तसेच नवापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.








