नंदुरबार l
शहरातील कोकणीहिल परिसरात भांडण सोडविल्याच्या कारणावरुन सलून दुकानात घुसून दोघांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील कोकणीहिल परिसरात मिथून हिरा राठोड याचे पाणीपुरीवाल्याचे पाणीपुरी खाण्यावरुन भांडण झाले. सदर भांडण दीपक भटू सुर्यवंशी यांनी सोडविले. या कारणावरुन दीपक सुर्यवंशी यांच्या मालकीच्या कोकणीहिल परिसरातील सुर्यवंशी हेअर सलूनमध्ये मिथून हिरा राठोड व कांतीलाल सुपडू जाधव यांनी प्रवेश करुन दीपक सुर्यवंशी व कारागीर राहूल सोनवणे यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत राकेश भटू सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.अमोल जाधव करीत आहेत.








