नंदुरबार l प्रतिनिधी
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने भल्या पहाटे भाजी विक्रेत्या महिलांना मार्केटमध्ये दाखल व्हावे लागते. अल्पभूधारक भाजी विक्रेत्या महिलांना उद्योजक जगदीश सितपाल यांच्या माध्यमातून थंडीपासून बचाव करणाऱ्या शालिंद्वारे मायेची ऊब मिळाली.
नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व्यापारी संकुलातील दररोज भाजीपाला विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिला भगिनींना रविवारी सकाळी उद्योजक जगदीश सितपाल आणि महेंद्र चौधरी यांच्या हस्ते गरम शालींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या आजीबाईंनी समाधान व्यक्त करीत मंगळ बाजार व्यापारीअसोसिएशनच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी सर्व ज्येष्ठ महिलांना महेंद्र चौधरी यांच्यातर्फे अल्पोपहार देखील देण्यात आला. या अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाप्रसंगी मंगळ बाजारातील व्यापारी कांतीलाल चौधरी, रमेश चौधरी,पवन बागुल, प्रकाश मराठे, महेश मोची, मोहन चौधरी,सुभाष जयस्वाल, दिनेश सोनार, राहुल चौधरी ,प्रेमचंद राजपूत आदींसह मंगळ बाजार परिसरातील व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








