नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात काल ११७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात एकूण १ लाख ८३ हजार ५१९ मतदारांपैकी १ लाख २४ हजार ६७७ मतदारांनी हक्क बजावील्याने सरासरी ६७.९४ टक्के मतदान झाले. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे दोन ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना दिड तास ताटकळत बसावे लागले.तर खापर येथे उमेदवारांची बेलेट पेपर सरकल्याने एकच गोंधळ उडाला होता. जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता सर्वत्र सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.उद्या दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरु आहेे. यात माघारीअंती सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आज दि.१८ रोजी प्रत्यक्षात ११७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी काही मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ५१९ मतदारांसाठी ४१२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यात दिवसभरात ९१ हजार ४५६ महिला मतदारांपैकी ६० हजार ८७६ महिला मतदारांनी मतदान केल्याने ६६.५६ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर ९२ हजार ६२ पुरुष मतदारांपैकी ६३ हजार ८०१ मतदारांनी हक्क बजावल्यिाने ६९.३० टक्के पुरुषांनी मतदान केले. एकंदरीत सरासरी ६७.९४ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख २४ हजार ६७७ मतदारांनी हक्क बजाविला. अक्कलकुवा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींपैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित ३० ग्रामपंचायतींसाठी ११९ मतदान केंद्रांवर काल मतदान प्रक्रिया पार पडली. यात १७ हजार ७९८ महिला तर १८ हजार ८५८ पुरुष असे एकूण ३६ हजार ५५६ मतदारांनी मतदान केल्याने अक्कलकुवा तालुक्यात ६१.८० टक्के मतदान झाले.
अक्राणी तालुक्यात ४७ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ४४ ग्रामपंचायतींसाठी १३९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात १४ हजार २३३ महिला तर १५ हजार ४१२ पुरुष असे एकूण २९ हजार ६४५ मतदारांनी मतदान केल्याने ५७.९३ टक्के मतदान झाले. तर तळोदा तालुक्यात राजविहिर या एका ग्रामपंचायतीसाठी ८४.८५ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले. शहादा तालुक्यात १० ग्रामपंचायतींसाठी ४० मतदान केंद्रांवर ६ हजार ६७८ महिला तर ७ हजार ७७ पुरुष असे १३ हजार ७५५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ७०.७७ टक्के मतदान झाले. नंदुरबार तालुक्यातील १८ पैकी कानळदे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित १७ ग्रामपंचायतींसाठी ५९ मतदान केंद्रांवर ११ हजार ७८५ महिला तर १२ हजार २३० पुरुष मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ८२.६१ टक्के मतदान झाले. नवापूर तालुक्यात १६ पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ ग्रामपंचायतीसाठी ५२ मतदान केंद्रांवर ९ हजार ६३१ महिला तर ९ हजार ५८५ पुरुष मतदारांनी असे एकूण १९ हजार २१६ मतदारांनी मतदान केल्याने ८३.८२ टक्के मतदान झाले. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे दोन ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना दिड तास ताटकळत बसावे लागले
तर अक्कलुवा तालुक्यातील खापर येथील वॉर्ड क्रमांक ३ साठी असलेलं बुथ ३अ च्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदात्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये सर्वसाधारण जागेवर असलेल्या मुस्लिम समाजातील उमेदवारांची बेलेट पेपर सरकले असल्याची बाब प्रतिनिधी,उमेदवार व केंद्रावर असलेल्या अधिकार्यांना निदर्शनात आणून दिली.त्यानंतर मतदान प्रक्रियेला थांबवण्यात आले.तहसीलदार रामजी राठोड यांनी सदर केंद्रावर धाव घेतली,झालेल्या प्रकारची निवडणूक आयोगाला माहिती दिली.दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत घटनास्थळी तात्काळ हजर झाले.उद्या दि.२० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.








