म्हसावद l प्रतिनिधी
महादेवाच्या अश्रू पासून रुद्राक्षाची निर्मिती झाल्याने रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शारीरिक व आर्थिक लाभ होतो. रुद्र म्हणजे महादेव तर अक्ष म्हणजे अश्रू,भगवान शिवच्या अश्रुतून रुद्राक्षाची निर्मिती झाल्याने रुद्राक्ष परिधान केला पाहिजे, लहान रुद्राक्ष परिधान केला तर उत्तमच असे मत शिवपुराण कथाकार ह.भ.प.महेश महाराज जोशी बभडाजकर यांनी वडाळी ( ता. शहादा ) येथे शिवपुराण कथेचे निरूपण करतांना केले.
निरूपणात जोशी यांनी कुंकवाला भारतीय स्त्रीच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व असून, जोपर्यंत पती जिवंत तोपर्यंत स्त्रीच्या कपाळावर कुंकू शोभून दिसतो. जन्म आणि मृत्यू यातील फरक सांगताना त्यांनी जन्माला येणारा प्रत्येकाला मृत्यूचा आभास झाला पाहिजे, आयुष्यभर कमावलेलं स्मशानभूमीच्या कोट्यापर्यंतच सीमित असतं.
म्हणून जगतांना माणूस म्हणून जगा, जगजेता सिकंदर देखील खाली हात गेला असा देखील सल्ला त्यांनी उपस्थित भाविकांना दिला. शिवपुराणात नऊ रस आहेत यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवणम, पूजन, वंदन, दास्य, सख्यभक्ती व आत्मनिवेदन या नवरसांवर सखोल विवेचन करत असतांना त्यांनी बाल संस्कार, धर्म, संस्कृती या विषयांवर देखील विवेचन केले.हार्मोनियमवर नाना महाराज आंबेकर, तबला वादन पिंटू महाराज आंबेकर, गायन सोनू महाराज आंबेकर यांनी केले. यावेळी शिव पार्वती यांचे सजीव देखावे ग्राम कलाकारांनी सादर केले. या कथेला वडाळीसह परिसरातील भाविक महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.कथेचं आयोजन वडाळी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला आहे.








