नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील एका कृषी केंद्रात खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने कृषी विभागाने कारवाई करत सदर कृषी केंद्राचा परवाना रद्द करत तब्बल २९५ मे.टन खतसाठा जप्त केला आहे. अद्यापपावेतोची कृषी विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
खांडबारा येथील न्यू श्री कृषी सेवा केंद्रात अनियमितता होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहिम अधिकारी जे.एस.बोराळे यांच्यासह दोन निरीक्षकांनी तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळून आली. यामध्ये संबंधित कृषी केंद्र संचालकाने खत नियंत्रण आदेशाप्रमाणे दरपत्रक अद्ययावत, साठा रजिस्टर, ई-पॉस मशिन, कंपनी निहाय, लॉट निहाय साठा लावून न ठेवणे, विक्री पावती अपूर्ण असणे,
घाऊक विक्रेत्यांची खरेदी बिले, ऑ-फॉर्म नसणे, परवान्यामध्ये समाविष्ट नसणाऱ्या खत कंपन्यांकडून खत खरेदी करणे आदी बाबींची अनियमितता दिसून आल्याने मोहीम अधिकारी यांनी सात दिवसांची मुदत देवून देखील संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकाने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सुनावणीत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यामुळे न्यू कृषी सेवा केंद्र खांडबारा या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच २९५ मे.टन खतसाठा जप्त करण्यात आला असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
सदर कारवाई मोहीम अधिकारी जगदिश बोराळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी शासनाची बाजू मांडली. नवापूर तालुका कृषी अधिकारी बी.जे.गावित, खत निरीक्षक वाय.एस.हिवराळे यांनी खतसाठा जप्त केला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर व कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
कृषी विभागाने सदरची कारवाई केली असली तरी आणखी काही कृषी सेवा केंद्रांमध्ये अशा प्रकारची अनियमितता आहे का? बोगस खतांची विक्री केली जात आहे का? याबाबत तपासणी करण्याची गरज देखील व्यक्त केली जात आहे.








