नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018 -19 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर द्वितीय आलेल्या लहान कडवान ता. नवापूर जि . नंदुरबार या ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समिती मार्फत तपासणी करण्यात आली .
सन 2018 – 19 अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची विभागस्तरीय समितीने तपासणी केली होती . या तपासणीत लहान कडवान ता . नवापूर . जि . नंदूरबार यांना विभाग स्तरावर विभागून व्दितिय क्रमांक देण्यात आला होता .
त्या अनुषंगाने पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे अवर सचिव चंद्रकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवार दि . १० डिसेंबर रोजी लहान कडवान येथे भेट देऊन गावात राबविण्यात आलेल्या विविध स्वच्छता विषयक उपकमांची पाहणी केली . यावेळी समितीत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे , सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांचा समावेश होता . समिती पाहणी दौर्यात नवापूर पंचायत समितीच्या सभापती बबीताताई गावीत , जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले, नवापूरचे गट विकास अधिकारी मानसिंग वळवी ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील , सरपंच सौ सरला पाडवी, उपसरपंच मनेश गावीत , उपकार्यकारी अभियंता दत्ता पिसे , गटशिक्षण अधिकारी आर . बी . चौरे ,विस्तार अधिकारी संजय पाटील , डी . एन . कुवर आदी उपस्थित होते .
राज्य स्तरीय समितीचे ग्रामस्थांनी पारंपारिक वेशभूषेत व आदिवासी छिबली नृत्यात स्वागत केले .समिती मार्फत शाळा , अंगणवाडी , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांची पाहणी करण्यात आली . याप्रसंगी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर , अभियंता तुषार देवरे, रुपेश पाटील ग्रामसेवक सोनवणे , मुख्याधापक एम. जे .सूर्यवंशी आदी सह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र चौधरी यांनी केले .









