नंदुरबार l
सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्याचा शासन आदेश पारित व्हावा. तीन आश्वासित योजनेअंतर्गत राज्यातील पात्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना श्रेणी पी.एस.आय.ची पदोन्नती सर्व लाभासह मिळावी, यासह विविध न्याय प्रश्न व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या न्याय प्रश्न व प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणुन नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी, पोलीस मतदर संघाची निर्मिती करावी, सेवानिवृत्त बांधवांना श्रेणी पीएसआयची पदोन्नती सर्व लाभासह मिळावी. तसेच अतिप्रधान रक्कम वसुली रक्कम पोलीस अंमलदार यांना परत मिळावी, अशा विविध 17 मागण्या करण्यात आल्या आहेत. सदरच्या मागण्या मान्य करण्यात येवुन आदेश जारी करावेत, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल ठाकूर, उपाध्यक्ष रमेश खवळे, सचिव जगन जगदाळे, संचालक रऊफ शहा, साहेबराव सैंदाणे, पोलीस बॉईजचे सुनिल चौधरी, मंगलाबाई गायकवाड आदींनी निवेदनातून केली आहे.