नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे झोपडीत झोपलेल्या महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणार्या एकास अज्ञाताने मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील खेडदिगर गावातील संताजी तोलकाटा जवळील मोकळया जागेत असलेल्या झोपडीत एक महिला झोपली होती. त्यावेळी भगवान कोळी याने आतप्रवेश करत महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. याकारणावरून अज्ञाताने भगवान कोळी याला हाताबुक्यांनी लाथांनी पाठीवर छातीवर व कंबरेवर मारहाण केली.
यात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान भगवान ईश्वर कोळी (३५) रा.खेतीया (ता.पानसेमल म.प्र.) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.