नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील महाराणा प्रतापांच्या पुतळ्या जवळ आज दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी अचानक चालत्या बस मधुन धुर निघाल्याने एकच धावपळ उडाली. विशेष म्हणजे बस मध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर बोराळा बस विद्यार्थी आपल्या गावाकडे रवाणा होत होती. मात्र तांत्रीक बिघाड झाल्याने अचानक बसमधुन मोठ्या प्रमाणात धुर निघु लागल्याने .तात्काळ विद्यार्थी आणि प्रवासी खाली उतरले. क्लच मधील बिघाडाने हा धुर निघाल्याचा दावा चालकाने केला. मात्र शेवटी भर रस्त्यात बंद पडलेल्या बसला विद्यार्थ्यांच्या मदतीने बाजुला करण्यात आले.
नंदुरबार बस आगारातील नंदुरबार बोराळे बस (क्र. एम.एच.२०, बी.एल. 3484) नंदुरबार बस आगारातून विद्यार्थी घेऊन बोराळेच्या दिशेने निघाली असता, बस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरच महाराणा पुतळ्याजवळ बस मधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली.बस मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच बसमधील विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला. चालकांना प्रसंगावधान राखत बस उभी करत तात्काळ वाहकांच्या मदतीने बसमधील विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर सुखरूप उतरविण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे हा धूर निघत असल्याचे सांगण्यात आले आहे.
रस्त्यातच बस मधून अचानक धूर निघू लागल्याने बघ्यांची गर्दी गोळा झाली होती तात्काळ बस आगारातून बसचा झालेला बिघाड व निघत असलेला धूर याचा तपास करण्यासाठी दुरुस्ती विभागातून मेकॅनिकलला पाचारण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी दुसरी बसची व्यवस्था करण्यात आली.रस्त्यातच बंद पडलेल्या या बसला विद्यार्थ्यांनी धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु बस सुरू झाली नाही.
बस आगारातून आलेल्या दुसऱ्या बसमध्ये बसून विद्यार्थी रवाना झाले चालकाच्या व वाहकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टाळला नंदुरबार बस आगारातील अनेक बस नादुरुस्त अवस्थेत असून त्या चालविण्याच्या प्रयत्न असल्याने असे अपघात होत आहेत.वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.