नंदुरबार | प्रतिनिधी
कृषि विज्ञान केंद्रात १६ वा तंत्रज्ञान महोत्सवाची सुरुवात करण्यात आलेली असून पोषक तृणधान्य पीक परिसंवाद आयोजन करण्यात आले होते. तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना आ.राजेश पाडवी, यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांनी जास्तीत जास्त तृण धान्य पिकाची लागवड करून आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश वाढवावा असे आवाहन केले.
प्रास्ताविकात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र राजेंद्र दहातोंडे यांनी तृणधान्य या महत्वपूर्ण पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले व तृणधान्यांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवावे. यावेळी त्यांनी कृषि विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या तंत्रज्ञान सप्ताहातील कार्यक्रमाची माहीती दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, यांनी मूल्यवर्धित पदार्थाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे. व तंत्रज्ञान महोत्सवात आयोजित कार्यक्रमांचा शेतक-यांनी उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. पोषक तृणधान्य पीक परिसंवाद संचालक पाटीलभाऊ माळी, विजय मोहिते, कांता बनकर, डॉ. संजय बोराळे, नितीन जगदाळे, प्रा. रवींद्र देशमुख व प्रा. विवेक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात डॉ. संजय बोराळे यांनी विविध पोषक तृणधान्य लागवड सुधारीत वाण आहारामध्ये पोषक तृणधान्याचे महत्व याविषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. विजय मोहिते यांनी जिल्ह्याभारामध्ये सुरु असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नितीन जगदाळे यांनी बचत गट सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले. कांता बनकर यांनी पॅकॅजींग व ब्रँडींग कशी असावे यावर मार्गदर्शन केले. यावर्षी कापूस पिकात केलेले नवनवीन प्रयोग व त्याचे परिणाम याविषयी विषय विशेषज्ञ पदमाकर कुंदे यांनी माहीती दिली.
पोषक तृणधान्य परिसंवाद परिषदेत अक्कलकुवा व धडगाव येथे सुरु असलेले राणीकाजल व तोरणा भगर युनिट यांच्या प्रतिनिधींचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिषदेसाठी परिसरातून मोठया प्रमाणावर शेतकरी महिला बचतगट व दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. आरती देशमुख व आभार प्रदर्शन पदमाकर कुंदे यांनी केले.
कृषि उद्योग परिषद
कृषि उद्योग परिषदेत सुपोषण वाटिका विषयी मार्गदर्शन करण्यात आले. विषय विशेषज्ञ, केव्हीसके आरती देशमुख, नंदुरबार यांनी सुपोषण वाटिका नंदुरबार जिल्ह्यासाठी किती महत्वाची आहे. या विषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित शेतकरी महिलांना सुपोषण वाटिकेची बियाणे कीट देण्यात आली.