नंदुरबार l
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या आयोजनाबाबतची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सदस्य तथा नाट्यकर्मी मनोज सोनार हे होते. जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून बालकलावंतांची देखील फळी उभी राहत आहे. त्यामुळे यापुढे बालकलावंतांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाव मिळणार आहे, असे मत बैठकीत व्यक्त झाले.
गेल्या अकरा वर्षापासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन होत आहे. सदर आयोजन गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यातर्फे राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंस्था व महाविद्यालये सहभागी होऊन आपला नाट्याविष्कार सादर करीत असतात. सदर बैठकीत जिभाऊ करंडक स्पर्धेत सहभाग घेणारे संघ व कलावंत स्पर्धकांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर, जितेंद्र खवळे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत आपले विचार मांडले. जिभाऊ करंडक ही स्पर्धा महाराष्ट्रातील प्रमुख एकांकिका स्पर्धेपैकी एक स्पर्धा आहे. या जिभाऊ करंडकमुळे नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून बालकलावंतांची देखील फळी उभी राहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना व रसिकांना विविध नाट्य अविष्कार अनुभवयास मिळत असतात, असे मत मनोज सोनार यांनी व्यक्त केले.
जिभाऊ करंडकच्या या बैठकीत नंदुरबार जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष एन.टी.पाटील यांनी जिभाऊ करंडकच्या नियोजनाबाबत आपले मत व्यक्त करीत जिभाऊ करंडक यशस्वी होण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नरेंद्र पाटील, एस.एन.पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुण कौशल्याला चालना मिळण्यासाठी जिभाऊ करंडकच्या अनुषंगाने शालेय स्तरावर देखील नाट्य स्पर्धाचे आयोजन करावे असे सर्वानुमते ठरले. जिभाऊ करंडकच्या या बैठकीत आयोजक राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासोबत रंगभूषाकार तुषार सांगोरे, विनोद ब्राह्मणे, तुषार सोनवणे, हर्षल महिरे, गौरव पाटील आदी उपस्थित होते.