नंदुरबार येथील जिल्हा तायक्वांदो असोशियनतर्फे घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण खेळाडूंना पालिका शाळा क्र.१ मध्ये नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते बेल्ट वाटप कार्यक्रम झाला. यावेळी रेड बेल्ट पाच खेळाडू, ब्ल्यू बेल्ट बारा खेळाडू, ग्रीन बेल्ट पाच खेळाडू तर येलो बेल्ट बावीस खेळाडूंना बेल्ट आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष परवेज खान, न.पा.पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक हारुण हलवाई, शेख रियाज, सय्यद इसरार अली, शेख साबीर आदी उपस्थित होते. यावेळी सौ.रघुवंशी म्हणाल्या की, तायक्वांदो हा खेळ मुलींना स्वरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी मुलींची संख्या जास्त बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तायक्वांदोसारखे खेळ सर्वांसाठी आवश्यक आहे. सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर परवेज खान म्हणाले, तायक्वांदोसारख्या ऑलम्पिक खेळातून नंदुरबारच्या खेळाडूंनी यश संपादन करावे व पुढे आपल्या जिल्ह्याचे नाव लौकीक करावे. तायक्वांदो जिल्हा प्रशिक्षक जावेद बागवान यांनी तायक्वांदो खेळातून जिल्ह्याच्या नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावे म्हणून तायक्वांदो जिल्हा असोसिएशनतर्फे मागील पंधरा वर्षापासून तायक्वांदो स्पर्धा, कॅम्प, शिबिरांच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार व प्रचार करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हैदर जाफर यांनी केले. तर आभार जावेद बागवान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काझी सुफियान, शाहीद मिया, साहिल शेख, केशव पावरा, शेख रहीम आदींनी परिश्रम घेतले.