देवास (म.प्र.) येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मध्यप्रदेश संघाला नमवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. या विजयी महाराष्ट्र संघात नंदुरबार जिल्ह्यातील आठ खेळाडूंचा समावेश होता.
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व मध्यप्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन दि.२ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यान कुशाभाऊ ठाकरे स्टेडियम देवास (मध्यप्रदेश) येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १४ राज्यांनी सहभाग नोंदवला. यात महाराष्ट्र संघाने तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, विदर्भ आणि अंतिम सामन्यात मध्यप्रदेश संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात उंपात्यपूर्व सामन्यात संदीप वसावे, उपांत्य सामन्यात दिनेश सोनवणे तर अंतिम सामन्यात सुनील गावित या खेळाडूंनी हॅट्रिक विकेट घेऊन विजय मिळूवन दिला. श्रावण गावीत या खेळाडूने उत्कृष्ट खेळी करत मालिकावीर किताब मिळवला तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून दिनेश सोनवणे तर उत्कृष्ठ फलंदाज म्हणून फिलिप वळवी याची निवड करण्यात आली. या विजयी संघात कर्णधार दिनेश भिल, मुनिल गावीत, श्रावण गावीत, फिलिप वळवी, गणेश देशमुख, सुमित कुवर, संदीप वसावे, संदीप गावीत, सुनिल गावीत, कल्पेश चौरे, विनोद सूर्यवंशी, दिनेश सोनवणे, आकाश बागुल यांचा समावेश होता. या विजयी संघास जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौरव दीक्षित, उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव जगदीश वंजारी, कार्याध्यक्ष संजय होळकर, प्रताप पगार, डॉ.मयुर ठाकरे, अनिल सहारे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विजयी संघास स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव अलोक खरे, देवास शहराचे युवराज विक्रमसिंह पवार, सॉफ्ट टेनिसचे महासचिव संदेश कांगटे, टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव विशाल सिंग, मध्यप्रदेश टेनिस क्रिकेट असो.च्या सचिव ललिता चव्हाण, रणजी खेळाडू राकेश आझाद यांच्या हस्ते चषक, पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.