नंदुरबार l
प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वयंसेवक व्हायला हवे. स्वयंसेवक असतांना त्यांना स्वतः काम करण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व निखारले जाते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.रविंद्र चौधरी यांनी केले. ते येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर पूर्वतयारी निवड चाचणी कार्यक्रमाप्रसंगी होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि श्री.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर अंतर्गत जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चेअरमन डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी, संस्थेचे सचिव रूपेश चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावं येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक महाविद्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सी.पी. सावंत, विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना नंदुरबार विभाग डॉ.विशाल करपे, जिल्हा समन्वयक डॉ.विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, नंदुरबार, डॉ.सुलोचना बागुल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, होमगार्ड ट्रेनर हवालदार निर्देशक डॉ.एम.जे.नन्नवरे, जिल्हा रक्तपेढी प्रमुख पॅथॉलॉजिस्ट डॉ.रामा वाडीकर, जिल्हा अग्निशामक दल विभाग प्रमुख जयराज साबळे, जिल्हा समन्वयक रूग्णवाहिका विभाग निलेश शर्मा, रासेयोचे विभागीय कार्यक्रम अधिकारी दिनेश देवरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.जयश्री नायका, क्रिडा प्रशिक्षक करणसिंग चव्हाण, डॉ.सतिष सुरये, प्रा.विलास पंडीत, सुरेंद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.कांतीलाल वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनल मोरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीश पाडवी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
प्रा.डॉ.विशाल करपे यांनी प्रास्ताविकेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाची भूमिका काय असते हे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरात विद्यापीठाने आयोजित केलेल्या उपक्रमावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थी हा विद्यापीठाच्या व्यवस्थापनातील केंद्रवर्ती विषय असल्याचे नमूद करून त्यांच्या सर्वागिण विकासाची भूमिका विशद केली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कशा प्रकारे चालते याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जीवनात कशाप्रकारे त्यांचे भविष्य घडवतात, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
डॉ.रामा वाडीकर यांनी विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रसंगावर कशाप्रकारे मात करावी व कोणकोणत्या प्रसंगी रक्तदान शिबिर आपण उपयोगात आणू शकतो, कशा पध्दतीने सतर्क राहून पीडितांवर आपण उपचार करू शकतो, याबद्दल माहिती दिली. प्रा.डॉ.रविंद्र चौधरी यांनी महाविद्यालय आणि संस्थेची गौरवशाली परंपरा सांगत असतांना महाविद्यालय कशाप्रकारे प्रगतीप्रथावर आहे आणि विद्यार्थ्याचे यशस्वी भवितव्य आमच्या महाविद्यालयाच्या मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या प्रगतीसाठी झटत राहू असे आश्वासन दिले.
शिबिरात एकुण ४० स्वयंसेवकाच्या विविध स्वरूपाच्या चाचण्या घेण्यात आल्या. विद्यापीठाच्या निकषानुसार शारीरिक चाचणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चर्चासत्रात सहभाग घ्यावयास प्रवृत्त करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वच निकष पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरात निवड केली जाईल. सूत्रसंचालन प्रा.सोनल मोरे यांनी केले. तर आभार प्रा.सुनिल गवळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.