नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयात यावर्षी होळी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
जिल्हा नियोजन व विकास समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. डॉ. गावित बोलत होते. ना. डॉ. गावित म्हणाले, राज्यात विविध महोत्सव साजरे करण्यात येतात.
होळी हा आदिवासी बांधवांचा महत्वाचा आणि मोठा उत्सव असतो. जिल्हयातील काठी, मोलगी, तोरणमाळण, धडगाव या भागात होलिकोत्सव विविध दिवशी साजरा करण्यात येतो. यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडत असते. परंतू हा उत्सव व्यापक स्वरुपात साजरा व्हावा यासाठी जिल्हयात होळी महोत्सव साजरा करण्याची संकल्पना आहे. या महोत्सवाचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. लवकरच त्यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे. या महोत्सवात दिव्यांगांसाठीदेखील कार्यक्रम असतील, असेही ते म्हणाले.
ना.डॉ.गावित पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मागच्या नियतव्ययाचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे आदिवासी उपयोजना क्षेत्रात २७७ कोटी, सर्वसाधारण क्षेत्रासाठी ९९ कोटी, अनुसूचित जमाती सामाजिक न्याय विभागाचे १२ कोटी असे नियतव्यय मंजूर करण्यात आले आहे. परंतू नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा असल्याने त्यात २५ टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्यामुळे वरील निधीमध्ये २५ टक्के वाढ करावी, अशी मागणी आपण राज्यशासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खा. डॉ. हीना गावित, आ. राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत आदी उपस्थित होते.