नंदुरबार l

तळोदा तालुक्यातील तलावडी गावाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तिघांना दुखापत झाली असून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील शरद बबन पाडवी, पवन रायसिंग वळवी व गणेश धनसिंग पाडवी हे तिघेजण दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एच ६२२०) तलावडी गावाजवळून जात होते. यावेळी कैलास रमण ठाकरे (रा.लक्कडकोट ता.तळोदा) याने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून इरा इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात शरद पाडवी, पवन वळवी व गणेश पाडवी यांना दुखापत जाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत मुकेश बबन पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात कैलास ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पौलाद भील करीत आहेत.









