नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बंधारे गावात दारुच्या नशेत २८ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नवापूर तालुक्यातील बंधारे गावात 28 वर्षीय जगदीश दयाराम वसावे या इसमाने घराच्या लाकडी आढ्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात दयाराम शांतू वसावे यांच्या फिर्यादीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवापूर पोलीसात दाखल केलेल्यात मृत्यूचे कारण दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र गावकऱ्यांच्या माहितीनुसार पारिवारिक समस्येतून टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी दोन अनोळखी इसमांनी मयत व्यक्तीच्या घरी येऊन मारझोड केल्याची ही माहिती समोर येत आहे. गावातील पोलीस पाटील यांच्या माहितीनुसार मयताच्या मोबाईलवर व्हिडिओ फोन कॉल व अनेक फोन आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मयताच्या मोबाईलचा तपासात मृत्यूचे गुढ उकललण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत तपासी अंमलदार बळवंत दिवाण वळवी हे अधिक तपास करत आहे.
जगदीश दयाराम वसावे यांनी गळफास घेतल्याचे शेजाऱ्यांना कळल्यानंतर लगेच त्यांनी गावाच्या पोलीस पाटीलांना माहिती दिली. लगेच त्यांनी वाचवण्यासाठी गळफासातून खाली उतरवलं, मात्र जगदीश यांचा तडफडून मृत्यू झाला. अशी माहिती गावाचे पोलीस पाटील यांनी दिली आहे.