नाशिक | प्रतिनिधी
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार दि. २७ पासून ते रविवार दि. १३ पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना श्री भगवती-श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्र उत्सवात व मागील २ वर्षात कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक यांची संख्या विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळणे गरजेचे आहे.
त्यामुळे श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने हा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे.तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांना २४ तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.