नंदुरबार l प्रतिनिधी
खान्देश साहित्य संघाचे पहिले बहुभाषिक साहित्य संमेलन जळगाव येथे होणार असल्याची घोषणा केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी केली.खान्देश साहित्य संघाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला.
साहित्यिक सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष डॉ.सदाशिव सुर्यवंशी होते. केंद्रिय सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, प्राचार्य अशोक शिंदे, प्रा.रमेश राठोड, ज्ञानेश्वर भामरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सभेत कोरोनामुळे निधन पावलेल्या साहित्यिक, कलावंत व देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ऑनलाईन माध्यमातून विविध कार्यक्रम खान्देश साहित्य संघाच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षापासून सुरू होते. आता पुढील अखिल भारतीय साहित्य संमेलन ऑफलाईन घेण्याचे ठरले. यावेळी आहिराणी भाषेसोबतच भाषा भगिनी या उद्देशाने खान्देशातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांचा समावेश या संमेलनात करण्यात येणार असून ग्रंथदिंडी, उदघाटन, स्मरणिका प्रकाशन, मुलाखत, परिसंवाद, कथाकथन, गझल मुशायरा, कवीसंमेलन, लोककला व लोकसंस्कृती दर्शन आणि समारेाप असे एकदिवशीय साहित्य संमेलन जळगाव येथे होणार असून साहित्यिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. मान्यवरांनी यावेळी सांगितले. खान्देशचा इतिहास ,आहिराणीच्या पाऊलखुणा टिपणारे खान्देशनी वानगी या आहिराणी त्रैमासिकाने सर्व उपस्थितांना सन्मानित केले. याप्रसंगी खान्देश साहित्य संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी कवी जितेंद्र चौधरी यांची तर नाशिक जिल्हाध्यक्षपदी कवी देवदत्त बोरसे, मालेगाव तालुकाध्यक्ष पदी कवी विवेक पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी कवी विजय निकम यांची निवड करण्यात आली. खान्देश साहित्य संघ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.याप्रसंगी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. कुणाल पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.संमेलन तथा विविध साहित्यिक विषयांवर विविध साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात नंदुरबार जिल्हाध्यक्षा गझलकारा हेमलता पाटील, उपाध्यक्ष विष्णू जोंधळे, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, कार्याध्यक्ष हेमंत निकम, चाळीसगाव तालुकाध्यक्ष विजय निकम, मालेगाव तालुकाध्यक्ष विवेक पाटील, देवळा तालुकाध्यक्ष आबा आहेर, सल्लागार मधुकर पवार, जळगाव जिल्हा सचिव ज्योती राणे, पुणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, शिरपूर तालुकाध्यक्ष के.बी.लोहार, कार्याध्यक्ष बी.व्ही.श्रीराम, शहादा तालुकाध्यक्ष अजबसिंग गिरासे, कवी कमलेश शिंदे,, ॲङ डी.एन.पिसोळकर, धुळे तालुकाध्यक्ष शाहिर श्रावण वाणी, कवी राजेंद्र सोनवणे,, ॲङ कविता पवार, पारोळा तालुका सचिव सचिन देशमुख आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी साहित्य संमेलनातून पुस्तकांचे स्टॉल व प्रदर्शनावर देखील भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. खान्देशातील साहित्यिकांना अधिकाधिक संधी देण्यासाठी खान्देश साहित्य संघाचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगितले. मध्यवर्ती आहिराणी, बागलाणी, नेमाडी, लाडशिक्की, पावरी, भिलाऊ, भावसारी, लेवा पाटीदारी, गुजराऊ, तडवी, डांगी, पावरा, कोकणी, नंदुरबारी, उर्दू , हिंदी, मराठी , अशा विविध बोलीभाषांचा समावेश व खान्देशातील विविध भाषांमध्ये लिहीणाऱ्या साहित्यिकांना या संमेलनात सामावून घेण्याविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन असल्याबाबत सांगितले. खान्देशाचा इतिहास आणि त्याच्या पाऊलखुणा या संमेलनातून अधिक उजागर होतील असा आशावाद व्यक्त केला. यासाठी खान्देश साहित्य संघाच्या वैचारीक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन देखील अध्यक्षांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव रमेश आप्पा बोरसे व प्रा. रमेश राठोड यांनी केले.