नंदूरबार l प्रतिनिधी
समाजात वावरत असतांना वैचारिक मतभेद होतात. मात्र सेवा देणाऱ्या माणसांमुळे समाजातील वैचारिक भिंती दूर करत विश्वास कायम राखला जातो. सेवेच्या क्षेत्रात तळा गाळातील माणसांसाठी कार्य करण्याची प्रेरणा अशा पुरस्कारांतून लाभते,असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठान-जळगावचे प्रमुख भरत अमळकर यांनी केले.

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री. पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. सहकार व शिक्षणमहर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीदिनी आयोजित विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्काराचे प्रदान अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात रविवारी सकाळी करण्यात आले. पुरस्कार प्रदान समारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील हे होते. यावेळी संसदरत्न खा.डॉ. हिनाताई गावित,आ.राजेश पाडवी, माजी आ. शिरीष चौधरी,मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, खरेदी विक्री संघ चेअरमन राजाराम पाटील, दूध उत्पादक संघ अध्यक्ष रवींद्र रावल, पंचायत समितीचे माजी सभापती माधव जंगु पाटील, प्रा. प्रकाश पाठक, प्रा. दिलीप रामू पाटील, नागाई शुगर इंडस्ट्रीचे डॉ. रवींद्र चौधरी, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, जगदीश पाटील, उद्धव पाटील, रमाकांत पाटील, रोहिदास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्री अमळकर म्हणाले, स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील हे कर्मवीर होते.त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार प्रेरणादायी ठरणारा आहे. संस्थेच्या वतीने प्रौढ मतिमंद, झोपडपट्टीतील रहिवासी आदींसाठी आश्रय- समतोल आदी उपक्रम राबवत आहोत. सेवेच्या क्षेत्रात मतभेद बाजूला सारून तळागाळातील माणसांसाठी कार्य करणे खरे संस्थेचे ध्येय आहे.

यावेळी जादूगर जितेंद्र रघुवीर यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, कोणत्याही पुरस्काराचे यश हे एकट्याचे नसून सामूहिक असते. जादू ही 64 कलांपैकी एक कला आहे. जादूतून समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. जादूमागे विज्ञान व तंत्रज्ञान असते. जादू म्हणजे शास्त्र होय. जादूगर हातचलाखी करतात, जादू म्हणजे दैवी शक्ती नव्हे. आजच्या पिढीने बुवाबाजीच्या मागे न लागता सुशिक्षित भारत घडवणे आवश्यक आहे.त्यासाठी शासनाने जादूला प्राधान्य द्यावे. प्रत्येकाच्या आयुष्यात जादू ही घडतच असते. सकारात्मक विचारात जादू दडलेली असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना आमदार पाडवी म्हणाले, स्वर्गीय अण्णासाहेबांनी परिसरात शिक्षण,आरोग्य, सिंचन, समाज,उद्योग आदी विविध क्षेत्रात विकासाचे कार्य करून क्रांती घडवून आणली. त्यांचे कार्य अमिट अशा स्वरूपाचे आहे. त्यांच्या जीवनावरील आधारवड हा ग्रंथ नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना डॉ. हिनाताई गावित यांनी म्हटले, ज्या ज्या वेळी आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून परदेश दौऱ्यावर जातो त्यावेळी जागतिक पातळीवर शहाद्याचे नाव घेतले जाते. स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने येथील विद्यार्थी शिकून परदेशात गेल्यामुळे शहाद्याचे नाव जागतिक पातळीवर काढले जाते.नंदुरबार मागास जिल्हा म्हटला जात असला तरी शहादा त्याला अपवाद आहे. या ठिकाणी दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभल्याने शहाद्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. स्वर्गीय अण्णासाहेबांची समाज सुधारणेची चळवळ पुढे नेण्याचे काम आपल्याला सामूहिकतेतून करायचे आहे. त्या पुढे म्हणाल्या, राजकारणी सुद्धा जादूगरच असतात. आजचा क्षण हा आपणा साऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
ना.डाॅ.विजयकुमार गावीत यांनी म्हटले, सहकार क्षेत्रातील अण्णासाहेब पी.के.पाटील यांचे कार्य विचार प्रवर्तक व प्रेरणा देणारे आहे.त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार व्यक्ती व संस्था या दोघांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

अध्यक्षीय समारोपात दीपक पाटील म्हणाले, आपण स्वर्गीय अण्णासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जात आहोत.या परिसरात राजकारणापेक्षा सामाजिक हिताला अधिक महत्त्व दिले जाते. थांबला तो संपला हे सूत्र आम्ही जपतो. इथे देणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र मोठ्या संस्था सांभाळताना अडचणी येतात. त्यावर मात करत पुढे जाण्यासाठी सहकार्य गरजेचे आहे.येथील विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी साठी परदेशात पोहोचला यामागे अण्णासाहेबांची प्रेरणा आहे. ते म्हणाले, शब्द असा बोलावा की बोलल्यावर पश्चाताप होऊ नये.काम करणा-या माणसाकडूनच चुका होतात. चुकीतून शिकणे महत्त्वाचे असते. परिसराच्या विकासाचे कार्य आपण पुढे नेत असून जे ही करणार ते समाज हिताचे असेल आणि समाजासाठीच करणार.

या कार्यक्रमात प्रा.ज्ञानी कुलकर्णी संपादित ‘आधारवड’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरुषोत्तम पुरस्कार संस्था स्तरावर केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव यांना तर व्यक्ती स्तरावरील पुरस्कार जादूगर जितेंद्र रघुवीर यांना देण्यात आला. पुरस्कारांत रुपये एक लाख, स्मृतिचिन्ह यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मकरंद पाटील यांनी केले.कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची तसेच विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








