नंदुरबार l
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार तालुक्यातील 75 व शहादा तालुक्यातील 74 अशा एकूण 149 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान तर सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदान व मतमोजणी आहे तेथे 17 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण दिवस, 18 सप्टेंबर रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस तर 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री करण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.








