नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 जुलैला संपुष्टात आला होता.दरम्यान नुकतीच 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ग्रामविकास विभागाच्या कार्यालयात काढण्यात आली होती. यात नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे.
आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आता अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार? विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी मिळणार की राजकीय समीकरणे बदलणार याकडे लक्ष लागून आहे.दरम्यान, 17 ऑक्टोबर रोजी जि.प.अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने याच दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता असून यास जिल्हा प्रशासन व जि.प.प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 जुलैला संपुष्टात आला होता. परंतु याच कालावधीत राज्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही. दरम्यान, सत्तासंघर्षानंतर नवीन शिंदे-फडणवीस सरकारने अध्यक्ष पदाला तीन महिन्यांची मुदत वाढ दिल्याने सत्ताधाऱ्यांसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत जणू हा बोनस काळ मिळाला होता.
दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. दि.17 ऑक्टोबर रोजी जि.प.अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यातच अध्यक्षपदासाठीची निवडणूक दि.17 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेवर कॉँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. अध्यक्षपदी कॉँग्रेसच्या ॲड.सीमा वळवी तर उपाध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी आहेत. जि.प. निवडणूकीनंतर कॉँग्रेस व शिवसेनेने युती करत भाजपाला सत्तेपासून रोखले होते. तर आता सत्ता स्थापनेसाठी भाजप देखील हालचाली करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आता राजकीय समीकरणांमध्ये नेमका काय बदल होतो हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जि.प.मध्ये सत्तांतर होणार की पुन्हा पुढील अडीच वर्षांसाठी विद्यमान अध्यक्षांना संधी मिळणार?नेमके काय होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.








