ग्रामीण समाजात मुलींच्या शिक्षणावर घरच्यांची अनास्था व सामाजिक मर्यादामुळे ब-याच मुली शिक्षणापासून वंचित होत्या. मुलींना शिकवून काय करायचे ? शेवटी परक्याचे धन ही पारंपारिक मानसिकता जनमानसात रुजली होती. भालेर गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय होती, परंतू मुलींच्या शिक्षणाबद्दलची कमालीची उदासिनता होती.
मुलींना जास्तीत जास्त सातवीपर्यंत शिक्षण घेत व नंतर घरकामाला लागत. मुलींसाठी स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था नव्हती. स्त्री शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व व बदलत्या काळाची गरज लक्षात घेवून भास्कर पाटील व त्यांचे सहकारी मित्रांनी मुलींसाठी स्वतंत्र माध्यमिक शाळा काढण्याचा संकल्प केला. भालेर गावातील ग्रामदैवत श्री काकेश्वर महाराजांच्या नावाने काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेची स्थापना २५ स्पटेंबर १९८५ रोजी केली. व कन्या विद्यालय जून १९८६ पासून सुरु केले. जून १९८६ पासून कन्या छात्रालयाची सुरुवात झाली. जून १९८७ साली कन्या विद्यालयाला मान्यता मिळवून अनुदान प्रात झाले. जून १९९० साली कन्या शाळेस शंभर टक्के अनुदान सुरु झाले.

संस्थेच्या वाटचाली
गाव पातळीपासून तर राज्य स्तरावरील कुटील राजकारणी लोकांनी खूप अडथळे आणले. अशा व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या लोकांचे डाव उधळून लावत आम्ही संस्थेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा ध्यास घेतला. आमचा गंभीर निर्धार व व्यापक समाज हितापुढे हितशत्रूंना नामोहरण व्हावे लागले. प्रसंगी कायद्याचा आधार घ्यावा लागला. मात्र संघर्षमय वाटचालीत स्पर्धात्मक कार्य करण्याची ऊर्जा आमच्यात निर्माण झाली. आमच्या उदात्त हेतूला पालकांचा प्रतिसाद संस्थेच्या कसोटीच्या काळात महत्त्वपूर्ण ठरला.
या वाटचालीत कुटुंबाचाही मोठी साथ लाभली माजी सरपंच सौ. बेबीताई भास्कर पाटील श्री. विजय भास्कर पाटील, सौ. प्राजक्ता विजय पाटील, श्री. चंद्रशेखर भास्कर पाटील, सौ. कविता चंद्रशेखर पाटील, वैष्णवी ऊर्फ मैत्री विजय पाटील, आरेन विजय पाटील, मानस चंद्रशेखर पाटील आदी कुटुंबीय सदैव पाठीशी राहिले.

पटसंख्येत वाढ
विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू या प्रामाणिक भावनेतून ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण हमी देण्याच्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो. भालेरसह नगांव, तिसी, वडवद, उमर्दे खुर्द, विखरण, आक्राळे, वडवारे, निभेल, कंढरे, भादवड, काकर्दे, जूनमोहिदे हाटमोहिदे नवी ओसरली या गावातून मुली विद्यालयात दाखल होवू लागल्या.
पटसंख्या वाढत गेल्यामुळे अनुभवी व पात्रताधारक कर्मचारयांमुळे मुलींसाठी माध्यमिक शिक्षभाची दर्जेदार सोय झाल्यामुळे उच्च माध्यमिक विभाग सुरु करावा, अशी मागणी पालकवर्गातून आल्याने संस्थेने ११वी कला वर्ग सुरु करुन उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन दिली. एसएससी व एचएससी बोर्डाच्या परिक्षेत निकालाची परंपरा सातत्यपूर्ण टिकविण्याची जिद्द शिक्षकवर्गात असल्याने ६८ विद्यार्थ्यापासून सुरु केलेले शाळा आज या शाळेत १२०० वर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

संस्थेची प्रगती
संस्थेच्या प्रगतीत भरभराट व्हावी म्हणून मा. के.पी. के. अण्णा पाटील, माजी खासदार के. चुडामण आण्णा पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावीत,भालेर येथील कै. अर्जुन शिवराम पाटील, कै. पितांबर रघा पाटील, कै. सिताराम सखाराम पाटील, कै. गंगाराम भिका पाटील, कै. दामू बापू पाटील, कै. मोतीराम बापू पाटील, कै. आत्माराम भूना पाटील कै. विश्राम राजाराम पाटील, कै. गंगाराम राजाराम पाटील, कै. श्रावण विठोबा पाटील, कै. रामभाऊ नत्थु कुवर, माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या अनमोल सहकार्यामुळे प्रखर विरोधकांना न जुमानता संस्थेच्या प्रगतीचा आलेख प्रतिवर्षी उंचावत गेला..

संस्था ग्रामीण भागात व लहान असूनही आज स्पर्धेच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवित आहे. पालकांचा शाळा व संस्थेवर असणारा विश्वासयाला कारण म्हणजे भास्करआबा व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिश्रम, सृजनशिलता, हजरजबाबीपणा, निर्णय क्षमता, सकारात्मक व आशावादी दृष्टीकोन, सहकारी व कर्मचारी यांच्यावर प्रेम व विश्वास. बिकट-अतिबिकट प्रसंगांना तोंड देण्यासाठी लागणारे ध्यैर्य, जिद्द, धाडस, चिकाटी, स्पष्ट वक्तेपणा असल्याने भास्करआबा एक खरोखर अमर्याद ऊर्जा, अखंड उत्साह त्यांच्या रोमारोमात भरलेला आहे.
नामकरणात बदल
१९९२ साली शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे नामकरण झाले कै.पी. के. पाटील यांच्या अनमोल सहकार्याची जाण ठेवून शाळेच्या नामकरणात बदल करुन कमलाताई श्रीमती पुरुषोत्तम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असे नामकरण करण्यात आले. शाळेला सहशिक्षणाची पालकांच्या आग्रहास्तव परवानगी मिळाल्याने मुलांनाही आमच्या शाळेत दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा लाभ मिळू लागला.
कन्या छात्रालयात मुलींची वाढती संख्या व संस्थेची भरभराट आणि निकालाची परंपरा पाहून पोटशुळ उठणाऱ्या विरोधकांनी छात्रालयाची मान्यता २००४-०५ मध्ये हेतूपुरस्कर पंचायत राज समितीला पुढे करुन, तपासणी करुन छात्रालयाची मान्यता काढण्यात आली. परंतू आमचा विश्वास व चिकाटी पालकांच्या प्रतिसादापुढे हितशत्रूही पराभूत झाले. छात्रालयाची मान्यता जोपासत अनुदान प्राप्त करुन घेण्यात आम्हाला यश आले. आर्थिक विवंचना सोसून प्रसंगी पदरमोड करून महागाईच्या काळात मुलींसाठी छात्रालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

कार्यक्षेत्राचा विस्तार
श्री.काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या विकासाचा परिचय सर्वदर झाल्यामुळे नेवाडे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) व खोक्राळे (ता.जि. नंदुरबार) या ठिकाणी शाळा काढून संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संस्थांनाही स्थानिक राजकारणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे नेवाडे येथील माध्यमिक विद्यालयाला जुनवने (ता. धुळे) येथे स्थलांतरीत करावे लागले. परंतू सामाजिक बांधिलकी व समर्पणाची भावना या गोष्टीमुळे आम्ही ध्येयापासून फारकत न घेता त्या संस्थांनाही लौकीक मिळवून दिला. १९८६ साली शाळा व मुलींचे छात्रालय सुरु केले. त्यावेळी शाळा व छात्रालयासाठी घरे व इमारत मिळणेही अवघड होते. छात्रालयासाठी भास्कर पाटलांनी घर उपलब्ध स्वतःचे करुन दिले. संस्थेचे संचालक मंडळ, सदस्य, सहकारी यांनीही विना भाड्याची आपली घरे उपलब्ध करुन दिली. (तालुक्याच्या बाहेरील ओबीसी, एससी, एस टी, एनटी प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी छात्रालय सुरु केले.)
संस्थेच्या वाटचालीत ३५ वर्षाचा कालखंड संघर्षमय असला तरी पुढील वाटचालीस प्रेरणादायी आहे. संस्थेच्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा शब्दबद्ध करताना भूतकाळातील संकटांना न जुमानता वर्तमानातील प्रगतीचा शोध घेताना आम्ही प्रगतीपासून फारकत घेणार नाही. आज संस्थेत ३८ शिक्षक, १४ शिक्षकेतर कर्मचारी असे एकुण ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. सवर्गीय छात्रालय अधिक्षिकासह २ कर्मचारी . शाळा एक एकर क्षेत्रात असून भव्य पटांगण त्यात सव्वा दोनशेहून अधिक विविध प्रकारची झाले जगविण्यात आली आहेत.
नवीन इमारत
भालेर येथील कन्या विद्यालयाला स्वतंत्र इमारत नव्हती. कै. तोताराम रघा पाटील यांनी अल्प किंमतीत जागा दिल्यामुळे इमारत अद्यावत दुमजली सुसज्ज
सर्व सुविधायुक्त इमारत आम्ही उभारू शकलो. याकामी कर्मचारी, हितचिंतकांचे योगदान सार्थकी लागले. छात्रालयासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली. शाळेची प्रगती व विकासाचा आलेख वाढत गेल्यामळे सर्व शिक्षण अभियानातून सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा सुरु झाली.
त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील घडामोडी व इंटरनेट सुविधेचे ज्ञान मिळू लागले. आज शाळेत २ डिजीटील क्लासरुम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्टाफरूम अशा एकुण वीस खोल्या दुमजली इमारतीत आहेत. येत्या काळात उच्च माध्यमिक विभागात विज्ञान शाखा, नर्सिंग कोर्स, प्राथमिक शिक्षण आदी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.

आधुनिकतेबरोबर संस्कृती जोपासना करणे, पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यवसायिक शिक्षण, मराठीबरोबर इंग्रजी शिक्षण, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक शिक्षण या विचाराचा पाठपुरावा व त्या दिशेने सातत्याने प्रयत्न, अल्पशिक्षित असून उच्च शिक्षितांनाही मागे टाकेल असे कायदे, प्रशासन, महसुल, शिक्षण, विधी, क्रीडा, समाजकारण व राजकारण या क्षेत्रात असलेले ज्ञान हे सखोल व अगाध आहे.








