नंदुरबार l
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, नंदुरबारतर्फे आयोजित जिल्हा युवा महोत्सव नंदुरबार नगरपालिकेतील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्धाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. उद्धाटनीय भाषणात बोलतांना श्रीमती.खत्री म्हणाल्या की, भारताचे भविष्य हे खऱ्या अर्थाने युवकांच्या हातात असून तेच भारत देशाला पुढे नेऊ शकतात. अशा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या अंगी असलेले कलागुणांना वाव देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रतीक कदम यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
महोत्सवात चित्रकला, मोबाईल फोटोग्राफी, कविता लेखन, युवा संवाद, भाषण प्रतियोगिता व सांस्कृतिक कलाप्रकार अशा सहा कला प्रकारात युवकांनी आपले कलागुण दाखवले. त्यातून देशभक्ती, स्वच्छ भारत मिशन, विकसित भारताचे लक्ष हे विषय सादर करण्यात आले होते.
युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण रमाकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी सर्व युवकांचे अभिनंदन व कौतुक करुन सशक्त भारत घडवायचा असेल तर तो आपल्या सारख्या तरुणांच्या हातूनच घडेल असे सांगितले. महोत्सवाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोज शेवाळे यांनी केले तर समन्वयक म्हणून डॉ.माधव कदम यांनी काम पाहिले.
यावेळी एकूण सहा कला प्रकारात 16 परीक्षकांनी उत्तमरीत्या परीक्षण केले. यशस्वी स्पर्धकांना राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन जिल्हा युवा अधिकारी अर्श कौशिक यांनी केले.








