नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सटीपाणी गावातील एका शेतातुन ११२ किलो ३३ ग्रॅम वजनाचे ७ लाख ८६ हजार ३३१ रुपये किंमतीची एकुण १५० गांजाची झाडे मिळुन आली असुन थानिक गुन्हे शाखेची कारवाई करीत ती जप्त केली असुन एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक यांनी गांजा, अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड करणार्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना दिले होते. दि. २ ऑक्टोंबर रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत शहादा तालुका हद्दीतील सटीपाणी गावात एका इसमाने त्याचे कपाशीचे पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी सांगितली.
त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व त्यांचे अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी सटीपाणी गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले, पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदारांनी त्यास पाठलाग केला असता तो शेजारी असलेल्या नाल्यातून जंगलात पळुन जाण्यात यशस्वी झाला.
पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे ११२ किलो ३३ ग्रॅम वजनाचे ७ लाख ८६ हजार ३३१ रुपये किंमतीची एकुण १५० गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला.तसेच संशयीत आरोपी गणेश लकड्या भोसले ( पावरा) रा. सटीपाणी ता. शहादा याच्याविरुध्द् शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ कलम ८ (क), २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उप निरीक्षक छगन चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, राकेश वसावे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, रमेश साळुके, पोलीस अमलदार विजय ढिवरे, राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, चेतन चौधरी, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उप निरीक्षक काळुराम चौरे, पोलीस हवालदार अमृत पाटील, रतन पावरा, दिनकर चव्हाण यांचे पथकाने केली.
तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा | परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षकपी.आर.पाटील यांनी केले.








