नंदुरबार l
प्रतिवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त विविध साज शृंगार आणि वस्त्रे परिधान केलेल्या कासार समाज निर्मित कालिका माता मूर्ती व मंदिर नंदुरबारकरांचे श्रद्धास्थान ठरले आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीप्रमाणेच पूर्वाभिमुख असलेल्या कालिका माता मंदिरात दररोज सकाळी थेट मूर्तीवर सूर्यकिरण येत असल्याने कालिकामातेचे विलोभनीय रूप पहावयास मिळते.
नंद गवळी राजांच्या नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातर्फे 2014 मध्ये जागृत कालिकामाता मंदिर उभारण्यात आले. सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे माजी अध्यक्ष भास्कर नाना कुंभकर्ण यांच्या कारकिर्दीत मंदिराची निर्मिती झाली.देसाईपुरयातील प्रसिद्ध काका गणपती मंडळाजवळच असलेल्या कालिका माता मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव होत असतो.याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा तसेच चैत्र नवरात्र उत्सव देखील भाविक मोठ्या प्रमाणावर साजरा करतात.
समाज बांधवांनी एकत्रित येऊन कालिका माता मंदिराची उभारणी केली आहे. दगडी पाषाणातील विलोभनीय मूर्ती आणि भव्य सभामंडप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.मंदिरात दररोज सकाळ आणि सायंकाळी कालिकामाता मूर्तीची विधिवतपणे पूजाअर्चा होत असते.नवरात्रोत्सवात देवीचे सप्तशती पाठ वाचन करण्यासाठी महिला भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.सौ.पुष्पा प्रमोद कुंभकर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळ कार्यरत आहे.अध्यक्षा म्हणून सौ.शारदा दीपक अंधारे, उपाध्यक्ष सौ.शिल्पा अरुण कोळपकर तसेच सचिव म्हणून श्रीमती जयश्री संजय कुंभकर्ण आणि कोषाध्यक्ष निशा अभय कुंभकर्ण, समता विजय कुंभकर्ण या महिला कार्यरत आहेत. तसेच सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज अध्यक्ष निलेश कोळपकर यांच्या मार्गदर्शनातून कालिका माता मंदिर नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवयुवक मंडळाचे देखील सहकार्य लाभत असते.
कालिका माता मंदिर आणि कासार समाजाच्या माध्यमातून समाजातील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येते.दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी कालिका माता मंदिर उत्सव समिती देखील गठित करण्यात आली आहे.








