शहादा l प्रतिनिधी
खरेदी विक्री संघ ही शेतकरी सभासदांची हक्काची विश्वसनीय संस्था आहे.शेतकरी बांधवांनी घरपोच खत खरेदी व्यवहारातील फसवणूकीपासून दक्ष राहावे. सध्या सेंद्रिय खतांच्या नावाने घरपोच बनावट खते पुरवणा-या काही खाजगी व्यक्ती कार्यरत आहेत.त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होत असून ही बाब वेळीच लक्षात येत नसल्याने आपले आर्थिक नुकसान होत असते.अशा व्यवहारातून फसवणूक टाळण्यासाठी हक्काची संस्था असलेल्या खरेदी विक्री संघातूनच शेतकरी बांधवांनी खत, बियाणे,औषधी आदि कृषी निविष्ठा खरेदी करून आपला आर्थिक विकास साधावा,असे आवाहन सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले.
तालुका खरेदी विक्री संघाची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संघाचे चेअरमन राजाराम तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधव जंगु पाटील, संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, दूध संघाचे चेअरमन रवींद्र रावल,दूध संघाचे माजी चेअरमन उध्दव रामदास पाटील, शहादा नगरपालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना दीपक पाटील म्हणाले, सभासदांचा विश्वास कायम राहण्यासाठी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. स्वर्गीय अण्णासाहेबांच्या शिकवणीनुसार आपली सहकारी क्षेत्रातील वाटचाल सुरू आहे.आपण चुकीच्या कामांना समर्थन कदापी देत नाही व देणारही नाही. सहकारी संस्था चालवतांना अडचणी येतात, मात्र पारदर्शकतेमुळे या अडचणींवर मात करता येते. आपण शेतकरी हितास नेहमी प्राधान्य देत असतो. ते आपले कर्तव्यच आहे.

संस्थेच्या वाटचालीत अडथळे निर्माण करणारे घटकही असतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य मार्गाने पुढे जाता येते.येथे शेती आणि शेतकरी यांच्या विकासाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे उपक्रम व प्रयोग राबविले जातात. श्री. पाटील पुढे म्हणाले, जमीन विकून शेतकरी बांधवांचे भले होणार नाही. शेतीत कष्ट करून व आधुनिक प्रयोग राबवून स्वतःचा आर्थिक विकास करणे आपल्या हातात आहे. आता ऑनलाईनचा जमाना आहे. आपणही जगासोबत चालणे आवश्यक आहे.शेतीत सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असून जागतिक घडामोडींचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम होणे स्वाभाविक आहे. आपली वाटचाल योग्य दिशेने असल्यास आर्थिक विकास होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यांत अहवाल वर्षातील आर्थिक पत्रके कायम करणे, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, नफ्याची वाटणी करणे, लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करणे,अडतीचे व इतर दर ठरविणे, बाहेरील कर्जाची मर्यादा व माल खरेदीची मर्यादा ठरविणे, लेखापरीक्षकाची नेमणूक करणे आदि विषयांचा समावेश होता.
प्रास्ताविक चेअरमन राजाराम तुकाराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन, आभार व प्रोसेडिंग वाचन मॅनेजर अनिल पाटील यांनी केले. यावेळी शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








