नंदुरबार l

नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र दि.२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रौत्सव आयोजित करण्यात येत असतो. यात्रौत्सवाच्या कालावधीत मंदिरामध्ये भाविक विशेषत: वयोवृध्द् व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले, मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. यात्रौत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये

यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भाविकांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तात्पुरत्या स्वरुपातील सुसज्ज अशा पोलीस चौकीचे उद्घाटन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अमंलदार सविता तडवी यांचे हस्ते करण्यात आले.
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व यात्रौत्सवात येणारे वयोवृध्द् व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, याकरिता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे,
जेणेकरुन वयोवृध्द् व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती अल्प विश्रामासाठी थांबतील व त्यांना दर्शनाचा तसेच यात्रौत्सवाचा आनंद घेणे शक्य होईल.संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील भाविक खोडाई माता मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची बाटली घेणे शक्य होत नाही. अशा सर्व भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय व्हावी व त्यांना नि:शुल्क पाणी उपलब्ध व्हावे, याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छ व नि:शुल्क पाणपोईची सोय भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
मंदिर व यात्रौत्सवात येणार्या भाविकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये, याकरिता चोरांपासून सावधान राहा, मौल्यवान दागिने सांभाळून ठेवा, प्रसार माध्यमांवर प्रसारित होणार्या खोट्या बातम्या, अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच इतर आशयाचे बॅनर्स देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मंदिर व यात्रा परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होणार नाही.
मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात. अशा घटना टाळण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांचे दामिनी पथके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी महिलांचे मौल्यवान दागिने चोरी होवू नये, म्हणून साध्या वेशातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अमंलदार यांचे विशेष पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत.
यात्रौत्सवादरम्यान विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली असून विविध ठिकाणी वाहने थांबविण्यास मनाई केलेली आहे. याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले असून त्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना देण्यात आली आहे
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यात्रौत्सव दरम्यान महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणारी बॅरिकेटिंगची पाहणी करुन योग्य त्या सुचना दिल्या. तसेच बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे असेल याबाबत उपस्थित अधिकार्यांना व यात्रौत्सवादरम्यान पोलीस प्रशासनास मदत करणार्या ६० स्वयंसेवकांना देखील मार्गदर्शन केले. सदर वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्यासह नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व इतर पोलीस अधिकारी तसेच पोलीस अमंलदार उपस्थित होते









