नंदुरबार | प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनामुळे खोडाईमाता यात्रोत्सव झाला न्हवता.मात्र शासनाने यंदा सुट दिल्याने मोठ्या उत्साहात यंदा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त उद्या दि.२६ सप्टेंबरपासून सुरू होणार्या नंदुरबार शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खोडाईमाता यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. यानिमित्त रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंदिर परिसरात स्वच्छता आदी पुर्ण झाली आहेत. मंदिर परिसरात विविध मनोरंजनासाठी पालख्या दाखल झाल्या असुन दुकाने थाटण्यासाठी दुकानदारांची लगबग काल दिवसभर चालू होती.

घटस्थापनेच्या दिवसापासुन खोडाईमाता यात्रोत्सवास सुरवात होते.९ दिवसांपर्यंत येथे यात्रा भरते.पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसह परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खोडाईमाता मुर्तीची स्थापना सुमारे चारशे वर्षापुर्वी झाली आहे. शहराच्या ईशान्य दिशेला असलेल्या या मातेचा लिखीत इतिहास उपलब्ध होत नाही.

मात्र सुमारे २५० वर्षांपासून या देवीचा उत्सव दरवर्षी नवरात्रात साजरा केला जातो. नंदुरबारकरांचे श्रध्दास्थान असलेल्या मंदिरातील खोडाई मातेची मूर्ती स्वमंभू आहे.मोठ्या दगडांमधून ही मुर्ती प्रकट झाली असल्याचे जुन्या जाणकारांकडून सांगण्यात येते.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मातेच्या दर्शनासाठी व नवस, मान-मानता फेडण्यासाठी नवरात्रमध्ये येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.ही मुर्ती लिंबाच्या झाडाच्या खोडाला लागून असल्याने खोडाईमाता असे नांव पडले आहे,
यात्रेच्या काळात नंदुरबार पालिकेतर्फे येथे साफसफाईचे काम करण्यात येते. मंदिर परिसराला आकर्षक रंगरंगोटी केली जाते.खोडाई मातेच्या यात्रेसाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांची येथे लाखोंच्या संख्येने हजेरी लागते.परराज्यातील व्यावसायिक नऊ दिवस आपली दुकाने थाटतात. पाळणा व मनोरंजनाची साधने यात्रेत उपलब्ध होतात.खेळणी व संसारोपयोगी वस्तुंची विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. पोलिस विभागातर्फे यात्रा काळात चोख बंदोबस्त लावला जातो.
शहरातील मान्यवरांतर्फे यात्रेकरूंचे स्वागत करणारे फलक जागोजागी लावले जातात.नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात शहरवासीयांचे धार्मिक विधी अव्याहतपणे सुरूच असतात. खोडाईमाता ही देवी मनोकामना पूर्ण करीत असल्याची दृढ श्रध्दा आहे. शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या खोडाईमातेच्या मंदिरावर नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते. विशेषत: देवीच्या यात्रौत्सवात भाविक रात्री मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.
गरबा मंडळांकडून तयारी
नंदुरबार शहरात व नवीन वसाहतींमध्ये गरबा मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील जुन्या वसाहतींमध्ये काही जुने गरबा मंडळ आहेत. या मंडळांच्या पदाधिकार्यांकडून गरबा नृत्यासाठी परिसराची सजावट साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. काही मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते.
बाजारात खरेदीसाठी गर्दी
घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.यात घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे मडके विक्रीसाठी उपल्ब्ध होते.३० ते ७० रूपयांपासुन विक्री होत होते,पुजेसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.
गरब्याची मोठी धुम
गुजरात राज्यात नवरात्रीत गरब्याची मोठी धुम असते. गुजरात राज्याला लागुन असलेला नंदुरबार जिल्हातही नवरात्रोत्सव धुमधडाक्यात मनवला जातो. मात्र यंदा जिल्ह्यात मुर्तीत दरवाढ झालेली दिसुन येत आहे









