तळोदा l प्रतिनिधी
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या कोकणकरांच्या मदतीसाठी तळोदा येथील तरुण धावून गेले. तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी तळोद्यातील तरुणांनी हातभार लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील महिन्यात कोकणात सावित्री नदीने जणू प्रकोपच केला होता. रायगड जिल्ह्यातील महाड, चिपळूण तसेच आजूबाजूचे ४१ गावांना त्यांचा फटका बसला होता. साधारणतः १२ ते १३ फूट पाणी शहरात शिरून वित्तहानी सोबतच जीवितहानी झाली. कालांतराने पुराचे पाणी ओसरले त्यासोबत उद्धवस्त झालेले संसार डोळ्यापुढे आले. या पुरात कोणाचे घरे वाहिली तर कुणाची दुकाने, तर काहींचे संपूर्ण संसारच उध्वस्त झाले.
पुरात झालेल्या नुकसानीतून कोकणकरांना काढण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यात तळोदा येथील वर्षा रहासे, नागेश पाडवी, रोहित ठाकरे, उमेश पाडवी, संजू कुऱ्हाडे, गोविंद पाडवी, नरेश पाडवी या आदिवासी तरुणांनी देखील सहभाग नोंदवत स्व:खर्चाने कोकण गाठले. कोकणातील महाड येथे दहा दिवस प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांची मदत केली. परांजपे स्कूल,आय.टी.आय. कॉलेज व आजूबाजूच्या आदिवासी वाड्यावर साफसफाई तसेच धान्य वाटपाचे काम केले. काही ठिकाणी गुडघ्या इतका चिखल साफ केला तर काही जागी वृद्धांचे मनातील पुरामुळे झालेल्या नुकसानाचे परिणाम ऐकून त्यांचा मनावरील दुःख घालवण्याचा प्रयत्न केला. काही भागात प्रचंड दुर्गंधी पसरली होती सर्वत्र हाहाकार माजला होता लोकांच्या डोळ्यात केवळ अश्रू होते. पुढील तीन-चार महिने ही कमी पडतील हे मोडलेले संसार पुन्हा उभारण्यासाठी अशा परिस्थितीत जीवाची परवा न करता केवळ माणुसकीचा नात्याने तळोद्यातील सात जणांनी पूरग्रस्त भागात स्व:खर्चाने जाऊन केलेल्या मदतीने कोकणकर देखील भारावले आनंद अश्रूंनी त्यांचे आभार मानून पाठवले. त्या तरुणांचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.