नंदुरबार l
जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने त्वरीत लसीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
लम्पी स्किन डीसीजचा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसामुंडा सभागृहात संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, पुलकींत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रताप पावरा, पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज पावरा आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी जनावरांमध्ये रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदूपासून 5 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरुपात लसीकरणास सुरुवात करावी. यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे. लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत 3 वाहने, तर जिल्हा प्रशासनामार्फत 2 अशी 5 वाहने उपलब्ध करुन द्यावीत. लसीकरणासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करुन लसीकरणास गती द्यावी.
लसीकरणाबाबतचा दैनदिन अहवाल सादर करावा. जिल्हास्तरीय कार्यदलाने प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रास वेळोवेळी भेटी द्याव्यात. लसीकरणासाठी अडचणी असल्यास त्या सोडविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
लम्पी स्किन डिसीज रोग नियंत्रण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली असल्याने बाधीत राज्यातून खरेदी- विक्रीच्या उद्देशाने होणा-या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले असून आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवावा. यासाठी पोलीस विभागाची मदत घेवून एकाही जनावराची वाहतुक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
लस ही पुर्णत: मोफत उपलब्ध असल्याने पशुपालकांनी पशूंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडील चार महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, हा आजार म्हैस वर्गातील जनावरामध्ये कमी प्रमाणात असून गाय, बैल, वासरु या पशुमध्ये लम्पी स्किनची लक्षणे जास्त प्रमाणात आहेत. आतापर्यंत 32 गावातील 50 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकाही जनावराचा या आजारामुळे मृत्यू झालेला नाही. आजारामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गोट पॉक्स लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून आतापर्यंत 10 हजार जनावरांचे लसीकरण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण 2009 बाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.
पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून जनावरांचे त्वरीत लसीकरण करून घ्यावे, तसेच आजारी जनावरे आढळल्यास 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीस सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी,सहकार विभाग, तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.








