नंदुरबार l प्रतिनिधी
मालेगाव येथील तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांड खटल्यातील तीन आरोपींना मालेगाव अप्पर व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे यश प्राप्त झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
घटनेच्या अकरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटित तसेच मध्यवर्ती कर्मचारी महासंघाने याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन 2011 मध्ये प्रचारसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी मनमाड जवळील पानेवाडी शिवारात इंधन भेसळ अड्यावर छापा टाकण्यास गेलेले तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. राजेंद्र देविदास शिरसाठ उर्फ राजू ,मच्छिंद्र पिराजी सुरडकर उर्फ कचरू आणि अजय मगन सोनवणे सर्व राहणार मनमाड अशी शिक्षा झालेल्याची नावे आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी कायदा हातात घेऊन मारहाणीचे प्रकार होत असल्याचा निषेध करीत राज्य सरकारने अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊन याबाबत कायदा करण्याची मागणी करण्यात आली.सरकारने तातडीने कारवाई करावी आणि स्व.यशवंत सोनवणे यांच्या मारकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत नंदुरबार शहरात देखील भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता.
कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चाद्वारे मागणी करून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.ए.टी.कुंभार यांना निवेदन देण्यात आले होते.तसेच नवापूर येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक प्रकरणी तिघांना शिक्षा झाली.तत्कालीन तहसीलदार संदीप भोसले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवर सातत्याने होणारे हल्ले आणि क्रौर्यची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.याबाबत केलेल्या पाठपुरावा संदर्भात श्री भोसले यांनी शासनाच्या वतीने रणजीतसिंह राजपूत यांचे अभिनंदन करीत राज्य शासनाचे प्रशस्तीत पत्र दिले होते.
अखेर राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटित पाठपुरावाला यश आल्याने न्यायालयामार्फत देण्यात आलेल्या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.








