नंदुरबार l
नंदुरबार जिल्हा धनगर समाजाचे कार्य हे अतिशय उल्लेखनिय आहे याची साक्ष देते असे मत महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.चिमण डांगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.नंदुरबार येथे आयोजीत जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात धनगर समाजात नव्याने विविध संघटना स्थापन होत असून सामाजिक कार्य व समाजाच्या विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या फायद्यापुरताच समाजाचा उपयोग केला जात आहे.

त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ता व तळागाळातला समाज बांधव यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी तसेच धनगर समाज महासंघाचे कार्य तळागाळातल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व समाजाची संघटन बांधणी, आरक्षण मेंढपाळाच्या समस्या व संघटनेचे आगामी उपक्रम अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये दौरे होत असताना नंदुरबार येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर महाराष्ट्र अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलका घोडे यांनी आपल्या मनोगतातून धनगर समाजातील महिला भगिनींनी आपला इतिहास लक्षात घेता सामाजिक कार्यात सहभागी होऊन महासंघाच्या कार्याला कसे पुढे नेता येईल याचा विचार करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे सरचिटणीस सुनील वाघ यांनी आपल्या भाषणातून नंदुरबार जिल्हा धनगर समाजाच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे व उपक्रमांचे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संघटन व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाचे विविध प्रश्न आरक्षण, मेंढपाळाच्या समस्या या सोडवण्यासाठी संघटना कशी कार्य करीत आहे याची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मळ यांनी आपल्या भाषणातून कर्मचारी महासंघाच्या वतीने आपण समाजातील कर्मचार्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच बांधील राहू अशी ग्वाही दिली.मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी आप्पादादा बागले. छगन नागरे,मल्हारसेना प्रदेश उपसरसेनापती विठ्ठल लांडगे, धुळे जिल्हा धनगर समाज महासंघाचे सरचिटणीस गोरख पाटील,नंदुरबार महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदा कुवर, मल्हारसेना जिल्हाध्यक्ष कन्हैय्या धनगर, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भास्कर धनगर, सांस्कृतिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम आढाव, अहिल्या महिला संघाच्या माजी जिल्हाध्यक्ष सुगंधा पेंढारकर, आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्ह्यातून दीपक भलकार,प्रा. बबन बागुल, सुगंधा पेंढारकर, रवींद्र आडगाळे, उल्हास लांडगे,मुरलीधर तेले यांची धनगर समाज महासंघ,कर्मचारी महासंघ ,अहिल्या महिला संघ, सांस्कृतिक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीत निवड करण्यात आली तसेच जिल्हा सांस्कृतिक महासंघाच्या अध्यक्षपदी बळीराम आढाव ,अहिल्या महिला संघाचे अध्यक्षपदी श्रीमती मिनल म्हसावदकर यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्याचे प्रास्ताविक दिपक भलकार, सूत्रसंचालन सतीष काटके,आभार प्रदर्शन रवींद्र आडगाळे व पाहुण्यांचा परिचय कैलास न्याहळदे यांनी केले.तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना,अहिल्या महिला संघ, कर्मचारी महासंघ,सांस्कृतिक महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त समाज बांधवांनी सहकार्य केले.








