नंदुरबार l
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते आ.चंद्रशेखर बावनकुळे उद्या दि.१३ रोजी नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत असून यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार येथील विजयपर्व येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पुढे श्री.चौधरी यांनी सांगीतले की, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आ.बावनकुळे प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याने भाजपातर्फे तसेच प्रदेश तेली महासंघातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा संघटनात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व सुक्ष्म असणार आहे. नळवा येथे बुथ बैठक तसेच बाईक रॅली काढून धुळे चौफुली येथे पारंपारीक नृत्य पथकांच्या माध्यमातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित संघटनात्मक बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहे.
तसेच सोशल मिडीया भाजपा प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, कन्यादान मंगल कार्यालयात भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी प्रदेश तेली महासंघातर्फे आयोजित मेळाव्याला आ.बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय चौधरी यांनी दिली. तसेच यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी आदी उपस्थित राहणार आहेत.








