नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आमोदा ते तलावडी रस्त्यावर दुचाकी अडवून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील साबलापाणी येथील शंकर भिलजी पावरा यांच्या दुचाकीने कृष्णा सोमा ठाकरे याचा अपघात झाला होता. त्या अपघाताचे दोन लाख रुपये दिले नाहीत या कारणावरुन शंकर पावरा हे आमोदा ते तलावडी रस्त्याने दुचाकीने जात असतांना कृष्णा सोमा ठाकरे,
दिल्या, विकास व एक इसम अशा चौघांनी त्यांची दुचाकी अडविली. शंकर पावरा यांना कृष्णा ठाकरे याने दगडाने मारहाण करुन दुखापत केली. तसेच इतर तिघांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत शंकर पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाबसिंग पावरा करीत आहेत.









