नंदुरबार l
महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण आहे. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता दरवर्षी सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध उपक्रम राबवून तो यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) कृष्णा राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, आरोग्य, शिक्षण व महिला व बालविकास विभाग यांनी योग्य समन्वय साधून हा यंदाचा पोषण महिना यशस्वी करावा. पोषण महिना कार्यक्रमाला केवळ जनआंदोलनाचे स्वरुप न ठेवता लोकांचा सक्रिय सहभाग असण्याकरीता विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सूचित केलेले आहे. यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करावे.
पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनाने 4 प्रमुख संकल्पनेद्वारे राष्ट्रीय पोषण महिना साजरा करावयाचा आहे. यात महिला आणि स्वास्थ्य, बालक आणि शिक्षण -पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ या संकल्पनेवर हा पोषण महिना साजरा करावा.
पोषण महिना राबविण्याकरीता उपक्रमाची तपशीलवार दिनदर्शिकानुसार गणेशोत्सव पोषण आरास व पोषण विषयक देखावे लावावेत. तरंग सुपोषित महाराष्ट्र कार्यक्रम संदर्भात माहिती द्यावी. पोषण रॅलीचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयेाजन करावे. सॅम असलेल्या अंगणवाडी केद्रांची तपासणी करावी. बालकांची आरोग्य तपासणी करावी. बालविवाह विरोधी शपथ द्यावी. स्थानिक भाजीपाला व फळे व रानभाज्याचे प्रदर्शने आयोजित करुन त्यांचे महत्व सांगावेत. गरोदर मातांसाठी योगाचे आयोजन करावे. मातांच्या बैठका घ्याव्यात.
सॅम, मॅम बालके, गर्भवती, स्तनदा मातांची तपासणी करावी. पाककृती स्पर्धांचे आयेाजन करावे. वैविध्यपूर्ण पोषण थाळी तयार करुन त्यांच्या स्पर्धा आयेाजित कराव्यात. गरोदर मातांची नोंदणी करावी. स्तनपानाविषयी माहिती द्यावी. महिला मेळाव्यांचे आयोजन करावे, असे विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन करण्यात येवून पोषण प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.








