नंदुरबार l प्रतिनिधी
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत राहुरी कृषी विद्यापीठ अधिनस्त शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथील शास्त्रज्ञांनी गुरुवारी सातपुडा रांगेतील नर्मदा काठावरील धडगांव तालुक्यातील अती दुर्गम भागातील शेतकर्यांपर्यंत पोहोचून दिवसभर त्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन विविध येणार्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत चर्चा केली व माहिती जाणून घेतल्या.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा रांगेतील नर्मदा नदीच्या काठावरील अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या धडगांव तालुक्यातील वरखेडी बु., चिचखेडी व भरड, येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या भेटी दरम्यान कृषि महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी संबंधित गावातील आदिवासी शेतकर्यांबरोबर चर्चा करताना त्या गावातील पीक पद्धती प्रत्येक पिकावर येणारी कीड व रोग तसेच खर्च व उत्पन्नाचा ताळेबंद जाणून घेतला. कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान गावांमधील पीक पद्धती गावाचा कृषि विकास आराखडा याबद्दल शेतक-यांबरोबर चर्चा करण्यात आली.
कृषि महाविद्यालयाच्या सर्व शास्त्रज्ञांनी पूर्ण दिवस शेतकर्यांबरोबर घालवत शेती कामामध्ये येणार्या दैनंदिन अडचणी बाबत चर्चा केली. याप्रसंगी जुनी फळबाग लागवड पूनररुजीवन, फळपिके प्रक्रिया उद्योग, औषधी सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया, जमिनीचे व्यवस्थापन, रोग कीड नियंत्रण, मधमाशांचे शेतीतील महत्व, शासनाच्या शेतीविषयक महाडीबीटी पोर्टल वरील विविध योजना, फायदेशीर शेतीची तत्वे, पीक विमा योजना, विविध कर्ज सुविधा याविषयी शेतकर्यांसोबत चर्चा केली तसेच येणार्या अडचणी व त्यावरील उपाय योजना याबाबत निरीक्षणे नोंदविली.
या उपक्रमात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले, तालुका कृषि अधिकारी, अक्रानी आर. एस. महाले, सरपंच वरखेडी सौ. रेशमा मंगेश वळवी, मंगेश संपत वळवी, समवेत सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिपककुमार अहिरे, डॉ. आर. ओ. ब्राह्मणे, प्रा. दिनेश सुर्यवंशी, प्रा. रंगनाथ बागुल, डॉ. संदीप वाघ, कृषि पर्यवेक्षक, भाऊसाहेब पाटोळे, संदिप सोनवर, व डॉ. सातपुते, संशोधन सहाय्यक यांनी शेतकर्यानं समवेत दिवसभर चर्चा करून मार्गदर्शन केले. या उपक्रमात शंभरहून अधिक शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.