नंदुरबार l
सर्व सार्वजनिक मंडळे, पदाधिकारी, प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले आहे.
गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात, त्यानुसार प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायदयानुसार https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करुन प्रति वर्षे रुपये 100 शुल्क भरुन नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे. प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडुन खरेदी करावा. प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्ययावत असावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावी.
मंडळांनी आवश्यक तेवढयाच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रितीने विल्हेवाट लावावी. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवकांनी स्वच्छता ठेवावी. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.








