नंदुरबार l
येथील नंदुरबार जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या वतीने 13 वी सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले-मुली डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ निवड चाचणीचे दि.4 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीत खेळाडूंची निवड करण्यात येणार असून निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा डॉजबॉल असोसिएशनने केले आहे.
सांगली जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या सहाय्याने महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली व डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार 13 वी सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले-मुली डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि.16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान मंगले ता.शिराळा जि.सांगली येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ देखील सहभागी होणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा डॉज बॉल असोसिएशन यांच्या वतीने दि.4 सप्टेंबर 2022 रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता नंदुरबार येथील अभिनव विद्यालयाच्या प्रांगणात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी निरीक्षक म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड चाचणीस येणार्या खेळाडूंनी जन्माचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. ही स्पर्धा मुले/मुली वय 17 वर्षाअंतर्गत घेण्यात येणार असून यासाठी खेळाडूंची जन्मतारीख खालील प्रमाणे असावी. सब ज्युनिअर 17 वर्षाआतील दि.01/01/2004 नंतरचा जन्म असावा. निवडलेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेस सहभागी होणार असून या स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येईल.
या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा डॉलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत निकुंभ, उपाध्यक्ष प्रा.ईश्वर धामणे, सचिव योगेश निकुंभ, धनराज अहिरे, निलेश गावित, राजेंद्र भोई, तुषार सोनवणे यांनी केले आहे.








