नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील पथराई फाट्याजवळ आयशरने कारला दिलेल्या धडकेत वडील व मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील बन्सीलाल नगर येथील डॉ.सचिन रतिलाल पाटील हे त्यांच्या मालकीच्या कारने नंदुरबार येथून त्यांच्या सासरी निझर येथे परिवारासह गेले होते.
निझर येथून परिवारास सोडून डॉ.सचिन पाटील (वय ३८) व त्यांचा मुलगा विश्वम सचिन पाटील (वय ७) हे कारने (क्र.एम.एच.३९ जे ७३०७) निझरहून तळोदामार्गे नंदुरबार येथे येत होते. यावेळी वाकाचार रस्ता ते नंदुरबार रस्त्यावरील पथराई फाट्याजवळ एका आयशर वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर वाहन भरधाव वेगाने चालवून कारला उजव्या बाजूस जबर धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात डॉ.सचिन पाटील व त्यांचा मुलगा विश्वम पाटील या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. अपघातानंतर आयशर वाहन चालक वाहन सोडून पसार झाला.
याबाबत डॉ.सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आयशर वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.








